वेगवेगळ्या कारणाने आपले जीवन संपवण्याची मानसिकता तयार होऊन बेळगाव शहर आणि परिसरात आत्महत्यांचे सत्र वाढत आहे. अनेकांचे आधार या आत्महत्यांमुळे हिरावून घेतले जातात.अचानक मानसिकता कमकुवत होऊन लोक आत्महत्येचा मार्ग निवडत असून या मार्गातून बाहेर काढण्याची गरज आहे.
काकती येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल सकाळी ही घटना घडली. विश्वनाथ रघुनाथ गोवेकर असे 42 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दाखल होऊन घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विश्वनाथला दारूचे व्यसन होते .तो कामावर जात नव्हता. कामावर जाण्यास घरच्यांनी सांगितल्यामुळे मनस्ताप करून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.
व्यसनाधीनता आणि त्यानंतर होणारी घालमेल यातुन ही आत्महत्या झाली असून अशा मनोवृत्तीत अडकलेल्या लोकांनी सर्वप्रथम व्यसनांमधून बाहेर येण्याची गरज आहे .
याच पद्धतीने शिवाजीनगर येथील एक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अमोल उर्फ बबलू मारुती नाईक (वय 40 ) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशीरा घरातील स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या वायरने गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले .मार्केट पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे .याचबरोबरीने रेल्वेखाली अनोळखी युवकाने आत्महत्या केली असून त्याची ओळख पटली नाही. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. हा तरुण 35 वर्षे वयाचा असून त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन ओळख पटवण्यासाठी पाठवला आहे. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर गांधीधाम एक्सप्रेस खाली झोकून देऊन या युवकाने आत्महत्या केली. रेल्वे स्थानकावरच हा प्रकार घडला आहे .त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला असून अंगावर पिवळा व चॉकलेट पटेल परिधान केली होती.
समस्या कितीही गंभीर असली तरी ती सोडवता येते त्यामुळे आत्महत्या हा पर्याय नाही. हे समाजाला पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा तरुणांना आपले जीवन किती बहुमोल आहे त्याबद्दल जागृती करण्याची गरज आहे .काही संघटनांनी यापूर्वी प्रयत्न केले आहेत. ते प्रयत्न थांबले. आता पुन्हा एकदा अशा संघटनांनी पुढे यावे लागेल.