बेळगाव सह आसपासच्या परिसरात तुफान पाऊस होत आहे त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे धरण कोणत्याही क्षणी तुडुंब भरणार आहे त्यामुळे मार्कंडेय नदीला पूर येऊ शकतो यासाठी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मार्कंडेय जलाशय तुडुंब भरण्याची शक्यता आहे.सोमवारी सकाळी जलाशयाची पातळी २३०२ फूट इतकी होती .त्यामुळे जलाशय भरल्यावर कोणत्याही क्षणी जलाशयाचे दरवाजे उघडले जाणार आहेत.
( रामलिंग पाटील तुडिये यांनी राकसकोप जलाशयाचा फोटो 29 जुलै रोजी दुपारी काढला होता)
जलाशयाचे दरवाजे उघडल्यावर नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ होणार असून नदीकाठावरील जनतेने उंच ठिकाणी वास्तव्य करावे अशी दवंडी द्यावी किंवा ध्वनीवर्धकावरून जनतेला कळवावे असे पत्रक कर्नाटक जल निगमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी काढले आहे.ग्राम पंचायतींनी जनतेला सुरक्षितस्थळी आसरा घेण्यासाठी कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष करून राकसकोप डॅम परिसरातील गावे उचगाव भाग आम्बेवाडी मन्नुर,कंग्राळी आदी मार्कंडेय नदी काठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.