बेळगाव शहराच्या पाण्याची भिस्त असलेल्या राकस्कोप जलाशय परिसरामध्ये पावसाची जास्त गरज आहे. त्या भागात कमी पाऊस होत असल्यामुळे राकस्कोप जलाशयाची पाणीपातळी अद्याप पूर्ण भरलेली नाही. मागील चोवीस तासांमध्ये फक्त चार इंचाने त्यात वाढ झाली आहे आणि जलाशय पूर्ण भरण्यासाठी अजून पाच फूट पाण्याची गरज आहे.
सोमवारी सकाळी जलाशय परिसरात 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दोन इंचाने वाढ होत आहे, जलाशयाची पातळी 2472.60 फूट एवढी झाली आहे. बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची पूर्ण जबाबदारी राकस्कोप जलाशयावर आहे. जलाशयात पाणी साठा कमी झाला तर शहरात पाणीटंचाई निर्माण होते.
जलाशयापासून पाईपलाईन घालून लक्ष्मी टेकडी येथे पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी बेळगाव शहराला पुरवले जाते .मागील वर्षी एप्रिल महिन्यापासूनच पाणीसाठा कमी कमी होत गेल्यानंतर डेड स्टोरेज मधून पाणी काढून ते बेळगाव शहराला सोडावे लागले होते. यंदा ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या भागात भरपूर पाऊस होण्याची गरज आहे.