मागील आठ दिवसांपासून बरसणाऱ्या आर्द्राने साऱ्यांनाच दिलासा दिला आहे. शनिवार दिनांक 22 जून रोजी दाखल झालेला आर्द्रा दिनांक 28 पासून पाच ते सहा जुलै पर्यंत जोरदार बरसला. यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले. मात्र शेतातील कामे रखडली होती. पुनर्वसुने मात्र उघडीप देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
पुनर्वसु नक्षत्राला तरण्या पावसाने शेतकऱ्यांना साथ दिली असून हा पाऊस सहा जुलै पासून सायंकाळी 4 चार वाजून 48 मिनिटांनी सुरू झाला आहे. पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करीत या पावसाचे वाहन गाढव आहे. अनियमित पाऊस पडण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असा हा पाऊस पडणार आहे.
दिनांक 20 21 22 24 25 27 28 29 30 31 जुलै ते एक आणि दोन ऑगस्ट पर्यंत पर्जन्य दृष्टीस हा पाऊस अनुकूल राहील असे सांगण्यात येत आहे. मात्र मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी कामात गुंतले आहेत आणि समाधानीही आहेत.
आर्द्रा नक्षत्र प्रवेश केलेल्या हत्ती वाहनाने अक्षरशा दमदार हजेरी लावून अनेक समस्या मिटविले आहेत. पाणीप्रश्न तसेच चारा प्रश्नही मिटला आहे. त्यामुळे आर्द्रा नक्षत्राने साऱ्यांनाच दिलासा दिला शेतातील काही प्रमाणात कामे रखडली असली तरी पुनर्वसुने शेतकऱ्यांची सोय केली आहे. त्यामुळे हे नक्षत्र काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासादायक ठरले आहे.
सध्या मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी सध्या भात लागवड बटाटा लागवड या कामात गुंतले आहेत. याचबरोबर मशागती व कोळपणी कामाने गती घेतली आहे तर काही भागात अजून पाणी साचून असल्याने त्या ठिकाणी कामे करणे कठीण जात आहे. आणखी काही दिवस उघडीप पडावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.