कडोली येथे नुकतेच रस्ता रुंदीकरण करून ग्रामस्थांना रस्त्यावर आणल्यानंतर आता मिनी स्टेडियमचा घाट घालण्यात आला आहे. मास्टरप्लॅन करण्यासाठी मिळालेले कमिशन खिशात घालण्यात आल्यानंतर आता मिनी स्टेडियमचे कमिशन हडपण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कडोली गावात चांगल्या प्रकारे मैदान उपलब्ध आहे. संपूर्ण आमराई आता वेगवेगळ्या खात्यांना, शाळाना वाटून देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणातच जागा शिल्लक आहे. त्यामध्येही हे मैदान गावासाठी शिल्लक असून त्यावरही काही राजकारण्यांनी आपले कमिशन घेण्यासाठी मिनी स्टेडियमचा घाट घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या मैदानावर कडोली आणि परिसरातील खेळाडू खेळतात. जर हे मैदान मिनी स्टेडियम झाले तर येथील नागरिकांना परगावी जावे लागणार आहे. मात्र राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेण्यासाठी येथे स्टेडियमचा घाट घातला आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत कडोली ग्रामपंचायत मध्ये स्टेडियम न करण्याचा ठराव करण्यात आला आहे. तरीदेखील काही राजकारण्यांनी स्टेडियम करण्यासाठी हालचाली गतिमान केले आहेत. सध्या पावसाळा सुरु असून यापूर्वी मैदानात चर खोदण्यात आली आहे. त्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र नागरिकांचा विरोध पाहून सध्या याला स्थगिती देण्यात आली आहे.
मास्टर प्लॅन चा फज्जा उडाला असून नागरिकांचा रोष घेत असताना देखील काही पुन्हा स्टेडियमचा घाट घातल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर यापुढे अशी कोणतीही अभद्र प्रकारे नागरिकांना विश्वासात न घेता कामे केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा नागरिकातून देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे तरी राजकारण्यांनी शहाणे व्हावे अशी मागणी होत आहे.