सिव्हिल हॉस्पिटल आवारात बेशिस्त पार्किंगमुळे अनेकांची डोकेदुखी वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी नातेवाईकही येत असतात. मात्र व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग करून नागरिकांचे जगणे मुश्कील करून ठेवण्यात आले आहे. बाहेर नोकरी करणारे या भागात येऊन वाहने पार्किंग करू लागले आहेत. त्यामुळे कोणीही यावे पार्किंग करून जावे अशी अवस्था निर्माण झाली आहे. याचा विचार सिविल हॉस्पिटल प्रशासन करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोरगरीब जनतेसाठी सिव्हिल हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रुग्णांचा ओढा हॉस्पिटलकडे आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना या परिसरात वाहने उभी करण्यास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी अस्ताव्यस्त पार्किंग करून अडचणी निर्माण करण्यात काही जण धन्यता मानू लागले आहेत.
शहरातील अत्यंत सुरक्षित पार्किंग म्हणून काहीजण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वाहने पार्किंग करून जातात. दुचाकी-चारचाकी वाहने दवाखान्याच्या भोवती उभी करण्यात येतात. विशेष करून आपत्कालीन विभागा जवळ असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे याचा बीम्स प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी होत आहे.
काही नोकरदारवर्ग सिव्हिल हॉस्पिटल परिसरात जागा मिळेल तिथे पार्किंग करू लागले आहेत. मध्यंतरी काही खाजगी रिक्षा चालक व टमटम वाले देखील या परिसरात वाहने उभी करत होते. मात्र त्यांना समज देऊन तेथील पार्किंग रद्द करण्यात आली होती. आता काही नोकरदार वर्ग या जागी पार्किंग करू लागले आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.