महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या उद्याने आणि सांस्कृतिक हॉलचा सध्या बोजवारा उडाला आहे. अनेक अनधिकृत प्रकार या उद्यानात आणि हॉलमध्ये घडताना दिसत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी मनपाने खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.
उद्याने आणि मैदान अनेक तळीरामांचे अड्डे बनले आहेत. दिवसभर गैरप्रकार करून उद्यानात जाणाऱ्या आणि खेळणाऱ्या खेळाडूंना नाहक त्रास देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याकडे मनपाने साफ दुर्लक्ष केले असून सध्या खाजगी सुरक्षा रक्षकांना नेमल्यास काही प्रमाणात अंकुश बसू शकणार आहे.
शहर आणि उपनगरात महानगरपालिकेची अनेक उद्याने आणि सांस्कृतिक हॉल आहेत. मात्र तेथील सुरक्षा रामभरोसे आहे. काही ठिकाणी हॉल व मैदानावर कर्मचारी तैनात असतात. मात्र त्यावर मर्यादा असल्याने अनेकदा गैरप्रकार घडतात. सुरक्षारक्षक असले तरी त्यांची तीन टप्प्यात नेमणूक करण्यात आली आहे. तरीदेखील मनपाच्या मिळकतीमध्ये रात्रीच्या वेळी अवैध प्रकरणांना ऊत येतो. अनेक मैदाने तर बार बनली आहेत. याबाबत नागरिकातून तक्रारीही ही देण्यात आल्या आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
ओपन बारवर पोलीस अनेक वेळा कारवाई करतात पण कारवाईनंतर ओपन बार पुन्हा सुरू होतात. महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असून अवैध वापरामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानामध्ये जेवणावळी सह ओपन बार गांजा पार्ट्या सुरू राहतात. याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे.