अखेर भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी झाले आणि कर्नाटकात चौदा महिने सत्तेवर असलेले काँग्रेस,निजद युतीचे सरकार पायउतार झाले.भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी होण्यात अकरा बंडखोरांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारणार नाही.आता भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार असून अकरा बंडखोरांचा पाठिंबा त्यांना मिळणार आहे.
काँग्रेस,निजद सरकार खाली खेचण्यात ज्यांनी किंगमेकरची भूमिका निभावली ते रमेश जारकीहोळी.आता रमेश जारकीहोळी यांना कोणते मंत्रिपद दिले जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.उपमुख्यमंत्रीपद आणि बेळगावचे पालकमंत्रीपद रमेश जारकीहोळी याना मिळणार अशी सध्या चर्चा सुरू आहे.
मंत्रीपदावरून डावलल्या नंतर रमेश जारकीहोळी दुखावले गेले होते.नंतर सतीश आणि रमेश जारकीहोळी यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले होते.काँग्रेस ,निजद सरकार खाली खेचायचे या उद्देशाने रमेश जारकीहोळी यांनी आपली ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती.दोन तीन वेळा टायमिंग चुकल्याने रमेश जारकीहोळी यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले पण शेवटी त्यांनी आपला पण खरा करून दाखवला.मंत्रिपद मिळाल्याशिवाय बेळगावला येणार नाही अशी भूमिका रमेश यांनी राजीनामा दिल्यावर आपल्या निकटवर्तीयाकडे व्यक्त केली होती.त्याप्रमाणे आता त्यांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाले आहे.उमेश कत्ती यांना देखील मंत्रिपद मिळणार असून बेळगाव जिल्ह्यातील कत्ती आणि रमेश जारकीहोळी यांना मंत्रीपदे मिळणार आहेत.सरकार खाली खेचल्यामुळे रमेश जारकीहोळी यांचा राजकीय दबदबा वाढला असून काँग्रेस पक्षातील लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गटाचे कार्यकर्ते रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.सरकार जरी पडले तरी बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर जारकीहोळी यांचेच प्राबल्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केवळ पक्ष बदलणार असून पालकमंत्री पद जारकीहोळी परिवाराकडेच असणार आहे.