बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला आहे. त्यामुळे रस्ते आणि इतर कामे मनपाने हाती घेतली आहेत. मात्र दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शहरातील नवीन रस्त्याचीही वाताहत झाली असून रस्त्यावरील खड्डे वर आले आहेत. त्यामुळे मनपाचा आंधळा कारभार उघडकीस आला आहे.
स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर बेळगावातील विविध रस्त्यांची डागडुजी आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्ते केल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या मनपाचा कारभार उघडकीस आला आहे. रस्त्यातील मोठमोठे खड्डे पहिल्या पावसातच वर आले आहेत. त्यामुळे रस्त्यांसाठी नेमका किती खर्च करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच स्मार्ट कामांच्या दर्जाचाही प्रश्न निर्माण होत आहे.
अनेक भागातील रस्त्याने कात टाकली आहे असे असतानादेखील योग्यरीत्या काम झाले नसल्याचे दिसून येत आहे. पहिल्या पावसातच खड्ड्यांनी पूर्व रूप धारण केले असून यातून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे निर्माण झाल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत रस्त्यांसाठी कोट्यावधी निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र केवळ डांबर घातल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या मनपाचा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे केलेले रस्ते गेले कुठे आणि आणि जे रस्ते करणार आहेत ते तरी व्यवस्थित होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा गांभीर्याने विचार करून रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी केवळ रस्त्यांसाठीचा वापरावा स्वतःच्या फायद्यासाठी नको असे मत व्यक्त होत आहे.