बामनवाडी येथील शांताई वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले 71 वर्षीय माधव वझे (काका) यांनी यावर्षी 40 गणपती बनविले आहेत. सेवंटी वन नॉट आऊट आणि फोरटी गणपती अशी माहिती त्यांनी बेळगाव live ला दिली.
वझे काका हे अविवाहित आहेत. लहान पणी पासून तेगणपती बनवितात. त्यांना शांताई वृद्धाश्रम येथे राहण्याची वेळ आली. आपले शिर्शी येथील वास्तव्य सोडून 5 वर्षांपूर्वी ते शांताई आश्रम मध्ये आले. त्यावेळी त्यांच्या पायाला त्रास होता. चालता येत नव्हतं, पण फिजिओथेरपी करून त्यांना सुधारून घेण्यात आले.
मूर्ती करण्याची त्यांची आवड होती. ते मातीचे गोळे करून मूर्ती बनवत बसायचे. एकदा चौकशी केली तेंव्हा आपण कुठलीही मूर्ती करू शकतो असे त्यांनी सांगितले. आम्ही मूर्तीसाठी लागणारे साहित्य आणून देऊ लागलो. आमचे एक संचालक महम्मद कुंनिभावी यांनी यात पुढाकार घेऊन साहित्य दरवर्षी आणून दिले. त्यामुळे पहिल्या वर्षी 10 , दुसऱ्या वर्षी 15 व यावर्षी 40 गणेश मूर्ती त्यांनी स्वतः बनविल्या आहेत. असे आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी सांगितले.
वझे काका शेडूचे व साचा न वापरता हाताने गणपती बनवतात.आश्रमाला भेट देणारे व्यक्ती त्यांच्याकडून गणपती घेतात. या मूर्ती तयार करण्यासलागलेल्या साहित्याचा खर्च वगळून उरलेली रक्कम त्यांच्या नावाने ठेवली जाते.