दहा ते बारा दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने बेळगाव शहराच्या अंतर्गत भागातील नागरिक हैराण झाले आहेत. किमान पाच दिवसांनी तरी एकदा पाणी सोडण्यात यावे अशी मागणी हे नागरिक करीत आहेत. पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड देताना अनेक समस्या येत आहेत अशी माहिती नागरिकांनी बेळगाव live ला दिली आहे.
गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली, अनसुरकर गल्ली, रामदेव गल्ली, केळकर बाग या परिसरात वेळेत पाणी सोडले जात नसल्याने समस्या येत आहेत. या भागातील विहिरी आटल्या आहेत. यामुळे नळाला येणाऱ्या पाण्यावरच या नागरिकांची भिस्त आहे पण पाणीच येत नसल्याने यांच्यासमोर पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.
पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीत होई पर्यंत पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. या मध्यवर्ती भागाला जोडून येणाऱ्या भागातही हीच स्थिती असून व्यवस्था करण्याची गरज आहे.