Sunday, January 12, 2025

/

रिक्षावाले आणि पोलीस संघर्षात पालकांना शिक्षा

 belgaum

रहदारी पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाधारकांनी गुरुवारी पुकारलेल्या संपात विद्यार्थ्यांसह पालक वर्ग भरडला गेला. रिक्षावाले आणि पोलीस या संघर्षात प्रामुख्याने पालकांनाच शिक्षा झाली आहे.
या रिक्षाधारकांचे नेतृत्व करणाऱ्या रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी पालकवर्गाला पुढील तिन दिवस बंद होणार असल्याचे सांगून मात्र उपकार केले आहेत. रिक्षाचालक आधी सूचना देऊन गुरुवार पासून संपात सहभागी झाले तरीही पालकांची प्रचंड तारांबळ उडाली. अनेक पालकांना स्वतःच्या वाहनांनी आणि वाहने नसणाऱ्यांना बसने आपल्या मुलांना शाळेपर्यंत पोचविण्याची वेळ आली.
नियमांचे पालन न करता होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीविरोधातील पोलिसांची कारवाई थांबविण्यासाठी संपाद्वारे वाहनधारकांनी प्रशासनावर दबाव टाकला आहे.दोन दिवसाआधी सदाशिवनगर येथे एका शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलीस आणि जिल्हाप्रशासन विभागाला अचानक जाग आली. नियमांचे पालन न करता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाधारकांविरोधात या विभागांनी धडक तपासणी मोहीम सुरू केली.

या कारवाईने धास्तावलेल्या रिक्षाधारकांनी ही मोहीम हाणून पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सलग तिन दिवस बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला. या निर्णयाचा फटका पालक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागला आहे. शहरात रिक्षा बरोबरच मारूती व्हॅन व ईतर वाहनांद्वारे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. ही वाहने येणार नसल्याने पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली. ज्यांची अशी व्यवस्था झाली नाही, त्या विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी घेणे भाग पडले. प्रत्येक शाळेतील जवळपास निम्मे विद्यार्थी रिक्षा वाहनांद्वारे ये-जा करतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना गुरुवारी पालकांच्या वाहनांवरून शाळा गाठावी लागली. शाळांच्या प्रवेशद्वारासमोर पालकांच्या शेकडो मोटारी येऊन धडकल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.
आता ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असून प्रशासन रिक्षाचालकांच्या मागण्या मान्य करणार का? हे समजू शकलेले नाही.

वर्दीतल्या रिक्षा चालकांनी सहा पेक्षा अधिक मुलांना घेऊन प्रवास करू नये हा नियम आहे. तो पाळला जात नाही यावरूनच पोलिसांनी कारवाई केली आहे. आता हा नियम कठोरतेने पाळला गेला तर वर्दीच्या रिक्षाचे प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे लागणारे भाडे वाढवावे लागणार आहे. यामुळे परत पालकांनाच फटका बसणार आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.