तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी जि पं च्या मुख्य कार्यकारी अधिकारी के वि राजेंद्र यांना निवेदन देऊन ज्या संघटनांनी माझ्यावर आरोप केले आहेत ते बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करणारे काही पैशासाठी अशी नाटके करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तालुका पंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. याबैठकीत एका दलित महिलेवर काम न केल्यास कारवाई करतो असा दम दिल्याचा आरोप करत माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मला या प्रकरणी काहीच माहीत नव्हते. सभागृहात विषय निघाल्याने मी काम करण्याच्या सूचना दिल्या. मात्र काही दलित संघटनांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत.
एका महिलेने सभागृहात आम्हाला सन्मान मिळत नसल्याचे सांगून आपली दिशाभूल केली. त्यामुळे मी त्या महिलेला काम करण्याच्या सूचना केल्या. मात्र काही दलित संघटनांनी आवळ्याचा भोपळा केला आहे. काही दलित संघटना केवळ पैशासाठी असे प्रकार करत आहेत. तेव्हा मला नाहक त्रास होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
वैयक्तिक लग्न पत्रिका वाटण्यासाठी महिला सदस्याने विनंती केली होती. मात्र यासबंधी दलित संघटनांनी नागरिकांची दिशाभूल केली आहे. तेव्हा अशा संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी शंकरगौडा पाटील यांनी निवेदनात केली आहे.



