सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील सुपीक जमीन बेकायदेशीररित्या बळजबरीने शासनाने ताब्यात घेतली असून ही जमीन परत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या संबंधीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सदर सांडपाणी प्रकल्प अन्यत्र हलवावा म्हणून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी,अधिकारी असलेली एक समिती स्थापन केली होती .या समितीच्या बैठकही झाल्या आहेत पण अद्याप निर्णय झालेला नसून त्या अगोदरच जिल्हा प्रशासनाने बळजबरीने सुपीक जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवला आहे.जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या कडे देखील शेतकऱ्यांनी सदर तक्रार केली आहे.
शेतात उभी पिके असताना पोलीस बंदोबस्त लावून पीक जमीनदोस्त करण्यात आले.शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर त्यांना गुन्हेगाराप्रमाणे अटक करून पोलीस स्थानकाला नेण्यात आले.शेतातील आंबा,चिक्कू,नारळ आणि अन्य झाडी जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
जमिनीच्या मालकांना सरकार गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत आहे.बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी हलगा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.