कंग्राळी खुर्द या गावातील एक पिता पुत्राची जोडी त्यांच्या देशप्रेमाच्या ध्येयाने सध्या गाजत आहे. पिता कृष्णा बेनाळकर हे भारतीय लष्करात कर्नल आहेत तर त्यांचेच चिरंजीव अंशुल बेनाळकर हे लेफ्टनंट पदावर नुकतेच नियुक्त झाले आहेत. या कुटुंबाने एकाच घरातुन दोन लष्करी अधिकारी देशाला दिले आहेत.
लष्करात भरती होण्याचे आजच्या युवकांचे स्वप्न असते. पण घरातील एक व्यक्ती लष्करात असेल तर ती निवृत्त होऊन परत घरी येईपर्यंत सहसा कोणी लष्करात जात नव्हते. पण आता ही कॉन्सेप्ट बदलली असून एका घरातील एक पेक्षा अधिक लोक लष्करात भरती होत आहे.
कर्नल कृष्णा यांनीही आपण लष्करी सेवेत असताना आपला चिरंजीव अंशुल यास लष्करात भरती करून असाच आदर्श निर्माण केला आहे. कर्नल कृष्णा हे कंग्राळी खुर्द या गावचे. बेळगाव पासून जवळच असलेले हे गाव आहे. या गावाने अनेक लष्करी जवान या देशाला दिले आहेत. कर्नाटकाच्या सीमाभागातील अनेक मर्द मराठे देशप्रेमाने लष्करी सेवेत दाखल होतात.
बेळगावची मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर असो किंव्हा देशभरातील इतर रेजिमेंट्स असो बेळगाव सह परिसरातील शूर मराठा जवानांनी आपणही काही कमी नाही हे सिद्ध केले आहे.कर्नल कृष्णा हे सुद्धा याच मर्द मराठा जातकुळीतले. त्यांनी स्वतः भरती होऊन देशाची सेवा केलीच पण आपण कर्नल पदावर जाऊन देशाच्या वेगवेगळ्या भागात सेवा करतानाच आपल्या घरावर, कुटुंबावर देशप्रेमाचे संस्कार केले आहेत.
या संस्कारांमुळेच त्यांचा नव जवान तरुण मुलगा आज देशसेवेत रुजू झाला आहे. या कुटुंबाला या निर्णयाचा अभिमान आहे. पती लष्करी सेवेत असताना आपल्या मुलालाही याच क्षेत्रात घालण्याचा निर्णय घेणारी माता रुपाली बेनाळकर यांच्या हृदयातील देशप्रेम पाहून प्रत्येक मातेच्या उरात अभिमान जागृत होईल असेच हे उदाहरण आहे.
गेल्या 9 जून रोजी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट हा रँक मिळवला सध्या ते जम्मू काश्मीर दोडा येथे कार्यरत आहेत तर वडील कृष्णा हे हैद्राबादला कर्नल म्हणून सेवा बजावत आहेत. बेळगावात असलेली सैन्य दलाची प्रशिक्षण केंद्रे आणि या मातीत असलेला लढाऊ बाणा यामुळे सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या युवकांची संख्या देखील वाढू लागली आहे.दोन महिन्यांपूर्वी बेळगावची कन्या भाग्यश्री पाटील हिने लेफ्टनंट पदावर निवड झाली त्या नंतर अंशुल याने देखील ही बेळगावची परंपरा कायम राखली आहे.
देश प्रेमाचे उदाहरण दिलेल्या कंग्राळी खुर्दच्या या ब्रेव फॅमिलीला बेळगाव live चा मानाचा सॅल्युट….