पाऊस आज येतो उद्या येतो अशी आशा लावून बसलेल्या साऱ्यांनाच शनिवारपासून खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली असे वाटले. त्यामुळे साऱ्यांनाच मान्सून शनिवारपासून दाखल झाला आहे याची अनुभूती आली.
शुक्रवार सकाळपासूनच पावसाचे आगमन झाले होते. मात्र म्हणावा तसा जोर नसल्याने पुन्हा पाऊस हुलकावणी देणार अशी भीती साऱ्यांना लागून होती. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर घेतला असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
जूनच्या सहा तारखेपासून मान्सूनला सुरुवात होणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र त्यांच्या भाकणूकेला शनिवार दिनांक 29 पासून मुहूर्त मिळाला आहे. पावसाने जोरदार सुरुवात केली असून शेती कामानाही आता वेग येणार आहे. भात लागवड आणि पेरणी झालेल्या भात पिकांना हा पाऊस पोषक वातावरण निर्माण करून देणारा ठरला आहे.
बटाटे लागवड आणि इतर कामे सुरू असलेल्या ठिकाणी जोरदार पावसामुळे कामे थांबणार असल्याची माहिती शेतकऱ्यांतून देण्यात येत आहे. मात्र जे बटाटे व इतर पिके पेरणी करून झालेत त्यांना हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून असाच पाऊस बरसत राहावा अशी मागणी सध्या तरी होत आहे. या पावसामुळे पाणीप्रश्न आणि चारा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहेत. त्यामुळे साऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.