पाठ्यपुस्तकातील होणारे घोळ अनेक विद्यार्थ्यांच्या माथी पडत आहे. मात्र आता अंगणवाडी पासूनच चुकांचा भडीमार आणि कन्नड सक्तीचा वरवंटा फिरविल्याचे दिसून येत आहे. मराठीमध्ये असणारी बाराखडी आता चौदाखडी म्हणून निदर्शनास येऊ लागली आहे. त्यामुळे मराठी भाषीका कडुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी जगवण्यासाठी सीमा भागातील नागरिक झटत असताना कर्नाटक सरकार मात्र आपल्यावर कायमच कानडीकरण सुरू ठेवत आहे. त्यामुळे आता शिक्षणही कानडी करण्याचा घाट घालण्यात येत आहे.
इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात मोठ्या प्रमाणात आणि घोर चुका झाल्या असताना आता अंगणवाडी पासूनच चुकांचा भडीमार करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत वेळीच पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
मूळ पायातूनच शिकवण्यात येणाऱ्या अंकलपी मधून मोठ्या प्रमाणात चुका करण्यात येत आहेत. विशेष करून बाराखडी असणाऱ्या बारा अक्षरांना बदलून त्या जागी कन्नड प्रमाणे चौदाखडी करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या चुका जर वेळीच सुधारणा केल्या नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे.
मराठी मधील काही अंकलपी मधून नवीन शब्द घालण्यात आले आहेत. हे शब्द मूळ अक्षरी नसून भलतीच घुसडण्यात आले आहेत.
हा सारा प्रकार लक्षात घेता कानडी करणाचा विळखा घट्ट आवळण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी अंकलपी तपासून बाराखडी आहेत की नाहीत पाहूनच खरेदी करण्यावर भर द्यावा. अशा चुका करणार्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.