शाळकरी मुलांना दररोज शाळेत ने आण करणारे रिक्षा गुरुवार पासून तीन दिवस बंद असणार आहेत.कारण पोलीस प्रशासनाने एका रिक्षात केवळ सहा विद्यार्थ्यांना ने आण करणे बंधनकारक केले आहे. सहा पेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन वर्दी करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याचा धडाका चालवला आहे.
या विरोधात शहरातील सर्व वर्दी करणारे ऑटो बंद करण्याचा निर्णय ऑटो चालकांनी घेतला आहे. गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी हे वर्दीतील ऑटो बंद असणार आहेत त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याना शाळेत सोडायची वेगळी सोय करावी लागणार आहे.
हे तीन दिवस वर्दीतील ऑटो रिक्षा बंद रहाणार असल्याने जे पालक आपल्या मुलांना रिक्षातून शाळेला सोडतात त्यांना स्वतःच्या खाजगी वाहनातून शाळेला सोडावे लागणार आहे.काल मंगळवारी दिवसभर रहदारी पोलिसांनी शेकडो ऑटो वर कारवाई करत दंड वसूल केला होता त्यानंतर अनेक ऑटो चालकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपली समस्या देखील मांडली होती.
एक रिक्षात सहा विद्यार्थी न परवडणारे..
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी आम्ही एका पालकाकडून 300 ते 600 रुपयांपर्यंत रक्कम घेतो. एका शाळेची मुले ने-आण करण्यासाठी (वर्दी) आम्हाला महिन्याकाठी दोन ते आठ हजार रुपये मिळतात. महिन्याला त्यापेक्षा जास्त खर्च आमचा गाडीवर होतो. एका वर्दीत सहा विद्यार्थी परवडणार कसे ? त्यामुळे आम्हाला फक्त शाळेच्या मुलांना सोडवण्यावर अवलंबून राहता येथे, असे मत रिक्षाचालकांनी बोलताना व्यक्त केलं आहे.
अनेक शाळांना स्वतःची स्कूलबस नसल्यामुळे पालक मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी रिक्षा मामांना प्राधान्य देतात पालक रिक्षाचालकांना वाढीव रक्कम देत नसल्याने आम्हाला रहदारीच नियम पाळले तर इतर वाहतूक करण्यास येणाऱ्या अडचणी यामुळे आमच्या पुढे अशा प्रकारे वाहतूक करण्याशिवाय पर्याय नसल्याचे काही रिक्षाचालकांनी सांगितले. यापुढे वर्दीत ल्या मुलांच्या पालकांनी प्रति महिना भाडेवाढ करणे देखील गरजेचे आहे.
वर्षाचा खर्च पंधरा हजार
गाडीची विविध कागदपत्रे घेण्यासाठी वर्षाला पंधरा हजार खर्च येतो. थोडा विलंब झाला तर आरटीओ नियमाप्रमाणे दंड लावतात. एवढा पैसा उभा करणे आम्हाला फक्त शाळेतील सहा ते दहा मुलांची वाहतूक करून शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही पालकांना विनंती करत असतो की वाढीव करून द्या.परंतू वाढीव रक्कम देण्यासाठी पालक पुढे येत नसल्याने स्कूलरिक्षाचे नियम पाळण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही चार दिवस रिक्षा बंद करून जिल्हाधिकाराना निवेदन सादर करण्यात येणार आहे.असे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले.