बेळगाव शहरात आज सकाळी पासून ढगाळ वातावरण आहे. सगळ्यांची जुनी पाठ व कंबरेची दुखणी वर आली आहेत. समाधानाची गोष्ट म्हणजे उष्णतेच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या असून पाऊस बेळगाव शहराच्या उंबरठ्यावर आल्याची चिन्हे दिसत आहेत.
दरवर्षी नैऋत्य मान्सून वारे सहा किंवा सात जूनला बेळगावला दाखल होतात आणि मृगाचा पहिला पाऊस बेळगावला येतो. आज तीन जून आहे यामुळे पाऊस लवकरच येईल अशी शक्यता आहे.
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी हिडकल आणि राकसकोप ही दोन्ही जलाशये आटली आहेत. थोडाच पाणीसाठा त्यामध्ये शिल्लक आहे. तसेच फक्त काही दिवस पुरेल इतकेच पाणी असून बऱ्याच भागात टँकरने पाणी मागवावे लागत आहे. आकाशात ढग आले तरी सूर्य अधून मधून आपल्या झळा सोडत असून त्यामुळे उरलेले पाणी सुद्धा आटत आहे. काही विहिरी व कुपनलिकांनी ही तळ गाठला आहे, यामुळे पाण्यासाठी तरी पाऊस लवकर पडणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आपली पेरणी पूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत. शेतकरीही पावसाकडे डोळे लावून बसला आहे. वेधशाळेने दिलेल्या अहवालानुसार यावर्षी खरीप हंगामात चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस लवकर पडला तरच पीक पाणी योग्य पद्धतीने होणार असून हा अंदाज खरा ठरावा यासाठी शेतकरी वाट पाहात आहे.