कठोर परिश्रम , सातत्य आणि संयम हीच यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे असे मला वाटते. आयएएस परीक्षेत देशात सतरावा आणि कर्नाटकात पहिला आल्याबद्दल आज बेळगावात माझा जो सत्कार होतो आहे याचा मला विशेष आनंद आहे. कारण माझा जन्म बेळगावात झाला. माझ्या आयुष्यातली वीस-पंचवीस वर्षे बेळगाव जिल्ह्यात गेली माझं शिक्षण सर्वोदय विद्यालय खानापूर येथे झालं त्या बेळगाव नगरीशी माझ्या भावना जुळलेल्या आहेत’ असे भावोत्कट उदगार राहुल संकनूर यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील द युनिक अकॅडमी व ज्योती करिअर अकॅडमी या संस्थांच्या वतीने आय ए एस परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आणि देशात सोळावी आलेली तृप्ती धोडमिसे हिचा व राहूल संकनुर याचा सत्कार के एल ई संस्थेचे चेअरमन प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आला .
पुढे राहुल म्हणाला, कि’आजचा हा सन्मान म्हणजे कठोर परिश्रमांचा सन्मान आहे . सिविल सर्विस परीक्षा या बुद्धिमत्तेवर असत नाहीत तर त्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतात. माझ्या हातून काय होते असा पूर्वग्रह मनातून काढून टाका . वेळेचे व्यवस्थित नियोजन करा तेव्हाच तुम्हाला यश मिळविता येईल.’
महाराष्ट्रात पहिली आलेली तृप्ती धोडमिसे यावेळी आपल्या भावना आणि अनुभव विषद करताना म्हणाली की,’ मी सोलापूरची आहे .माझे नातलग कर्नाटकात आहेत. त्यामुळे मला बेळगाव बद्दल आपलेपणा आहे .बी ई झाल्यानंतर मी चार वर्षे एल अँड टी कंपनीत नोकरी केली. ते करत असताना माझ्यात बरी क्षमता आहे असे वाटून मी नोकरी न सोडता एमपीएससीचा अभ्यास केला त्यात यशस्वी होऊन 2014 पासून आज पर्यंत पुण्यात असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स म्हणून काम करीत आहे.मी मराठी माध्यमात शिकलेली व छोट्या शहरात वाढलेली असल्याने घाबरत होते पण धाडस करून जॉब करता करता यूपीएससी केलं आणि त्यात मी यशस्वी झाले. तुम्ही परीक्षेला कशाप्रकारे सामोरे जाता,त्याची तयारी कशी करता, दुसर्यांच्या चुका पेक्षा स्वतःच्या चुका कशा सुधारता या गोष्टीअतिशय महत्त्वाच्या आहेत असे तिने सांगितले.
तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा आणि नियोजनबद्धरीत्या अभ्यास करा तुम्हाला यश निश्चित मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
या कार्यक्रमास आयकर विभाग हुबळीचे उपसंचालक आकाश भैरवनावर ,द युनिक अकॅडमी पुणे चे प्रवीण चव्हाण हे उपस्थित होते .समारंभाचे अध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील हे होते. द युनिक अकॅडमी बेळगाव शाखेचे प्रमुख राजकुमार पाटील तथा ज्योती करिअर अकॅडमी चे अमित सुब्रमण्यम यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रवीण चव्हाण यांनी करून दिला. राजकुमार पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शिवानी गायकवाड यांनी केले.