कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील दुकाने व इतर आस्थापनांवर मराठीसह कन्नड व इंग्रजी भाषेतील फलक पहावयास मिळतात. तसेच महापालिकेनेही शहरात तिन्ही भाषेत फलक लावण्यास परवानगी दिली आहे. मात्र फक्त कन्नड भाषेतच फलक लावण्यात यावा कन्नड संघटनांकडून दादागिरी केली जाते.
आज (रविवारी) सकाळी आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर कन्नड फलक लावा असे सांगत दादागिरी करण्यास सुरुवात केली. यावेळी व्यापाऱ्यांनी फलकावर मराठीसह कन्नडमध्ये लिहिलेले आहे. असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते दुकानदारांवर दादागिरी करीत होते. त्यामुळे वादावादीसह काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सातत्याने कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते व्यापारी वर्गाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुकानदार व व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून महापालिका व लोकप्रतिनिधीनी याकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा मराठी भाषिक आपल्या पध्दतीने कन्नड रक्षण वेदिकेला धडा शिकवतील असा इशारा देण्यात आला आहे.