बेळगावचा कॅन्टोन्मेंट विभागात येणारा कॅम्प परिसर हा पूर्वीपासूनच अतिशय शांत आणि रहदारीने मुक्त भाग म्हणून ओळखला जात होता. पण सध्या ही ओळख पुसली जात आहे. मोटारसायकल आणि कार बरोबरच या भागातून धोकादायक अवघड वाहतूक वाढली आहे. या अवजड वाहतुकीस परवानगी कुणी दिली? याला कोण आणि कशासाठी चालवून घेत आहेत व अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
कॅम्प परिसरात लहान वाहनांची वर्दळ तुरळक असते, या भागात राहणारे नागरिक आणि शहरातून पुढे टिळकवाडी कडे जाणारे व येणारे वाहन चालक वगळता इतर वाहने कमी प्रमाणात या मार्गे जात होती. पण शहरात आधीच अडचण ठरत असलेली अवजड वाहतूक कॅम्पातून कुणी वळवायला लावली? याचा शोध घेऊन ती थांबवणे गरजेचे वाटत आहे.
या भागात अनेक शाळा आहेत. सामान्य नागरिक चालत प्रवास करतात. अवजड वाहतूक वाढल्याने या लोकांनाच रस्ता ओलांडणे अवघड जात आहे. अवजड वाहनांच्या वेगावर निर्बंध सुद्धा घालण्यात आलेले नाहीत याचा कॅन्टोन्मेंट बोर्ड व रहदारी पोलीस जरूर विचार करतील अशी अपेक्षा आहे.