शहर आणि परिसरात उद्याने मैदाने व अनेक सांस्कृतिक हॉल हे तळीरामांच्या अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी तर अशा सार्वजनिक ठिकाणी अवैध प्रकरणांना उत येतो. त्याला अटकाव करण्यासाठी अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांवर खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. त्याबाबत महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अशा प्रकारांवर रोख आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
महानगरपालिकेकडे नोंदणीकृत उद्याने तसेच सार्वजनिक हॉल व मैदाने आहेत. हॉल व मैदानावर कर्मचारी तैनात करण्यात आले नाहीत तरी उद्यानांच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात नियुक्ती केली असली तरी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. या सर्व ठिकाणी तळीरामानी बाटल्यांचा खच पाडवला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन तीन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
जेवणावळी ओपन बार गांजा पार्टी मध्यरात्रीपर्यंत करण्यासाठी तळीराम बिनधोक असतात. सार्वजनिक ठिकाणी या प्रकारामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानांच्या सुरक्षितेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिक दमदाटी करून ताबा घेतात. परिणामी अनेक वेळा त्याच्यासोबत वादावादीचे प्रसंग होतात. त्यामुळेही अशा घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महानगरपालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करून अवैध प्रकारावर आळा घालण्यासाठी सभागृहात प्रस्ताव मांडण्याची गरज आहे.
सार्वजनिक ठिकाणी तळीरामांना रोखण्यासाठी महानगरपालिकेने पोलिसांसोबत एक बैठक करून यावर गंभीर विचार करून तळीरामांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना तळीरामांना चाप बसेल अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत मात्र महानगरपालिका कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. जर हे प्रकार असेच सुरू राहिल्यास येत्या काळात सार्वजनिक ठिकाणी तळीरामांचे कायमस्वरूपी अड्डे होतील ही भीती आहे.