स्त्री-पुरुष समानतेचा कितीही गाजावाजा केला तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिलांनाच करावी लागते. नसबंदीची शस्त्रक्रिया नको रे बाबा म्हणत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जाते. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियाचा दर कमीच असून मागील दोन वर्षात केवळ मोजक्याच पुरुषांनी नसबंदी केल्याची घटना सामोरी आली आहे. यामुळे स्त्रिया आघाडीवर असून पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे उघडकीस आले आहे.
महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी असते. महिलांची टाक्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची असेल तर किमान तीन दिवस दवाखान्यात घालावे लागतात. मात्र पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया दोन तासात उरकते. तरीही पुरुषांची या शस्त्रक्रियेसाठी नकारात्मक भूमिका असते. पुरुष नसबंदी बाबत समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. यामध्ये सुशिक्षित पुरुषही पुढे येत नाहीत. उच्चशिक्षित पुरुषांमध्ये या शस्त्रक्रियेबाबत जागृती करण्यात ही आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांचीच आहे, असा समज आजही पुरुषांच्या मानसिकतेत रुजू झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पुरुष याकडे दुर्लक्ष करतात.
लहान कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना गेल्या दोन दशकात सर्वदूर पोहोचली असली तरी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत म्हणावी तशी गती पकडलेली दिसत नाही. याच्यात पुरूष अजूनही मागेच असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. जर पुरुषांमध्येही हा गैरसमज असल्यास आरोग्य खात्याने जनजागृती करून त्याबाबत पुढाकार घेण्यासाठी प्रसार करावे ही काळाची गरज आहे.
अंधश्रद्धा आणि परंपरा मानणाऱ्या समाजात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया बाबत गंभीर उदासीनता दिसून येते. अनेकदा महिलाच नवऱ्याच्या अशा शस्त्रक्रियाला विरोध करत स्वतः शस्त्रक्रिया करून घेत असल्याचे आढळून आले आहे. बहुंताश स्त्रीयांना आपल्या नवर्याने ही शस्त्रक्रिया करू नये असेच वाटते. गैरसमज व अंधश्रद्धा म्हणून पुरुष नसबंदी करत नसल्याचे स्पष्टीकरण सामोरे आले आहे. त्यामुळे यावर ही गंभीर विचार करून यापुढे पुरुषांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.