काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता पुरता कामात गुंतला आहे. तालुक्याच्या उत्तर भागात पेरणीला वेग आला असून शिवारे शेतकऱ्यांनी फुलून गेली आहे. अजूनही पावसाची आवश्यकता असली तरी सध्या शेतातील इतर कामे करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
मृग संपला ,आर्द्रा ही सुरू झाला मात्र पावसाने ओढ दिली आहे. ढगाळ वातावरण असले तरी म्हणावा तसा पावसाचा जोर नाही. यामुळे साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत. मध्यंतरी वळीवाने थोड्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या कामात शेतकरी गुंतला आहे.
बटाटा लागवड भात पेरणी व इतर कामे शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागात शेती कामांना जोर आला आहे. लवकरात लवकर ही कामे आटोपून पावसाची प्रतीक्षा पुन्हा करावी लागणार आहे. शेतकरी आणि बैल जोड्याची गर्दी शेतात दिसू लागली आहे.
पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना ही आता वेग आला असून बटाटा लागवड उत्तर भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. तसे पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यात बटाटा लागवड होते. मात्र पाऊस नसल्यामुळे हे काम विलंबाने सुरू करण्यात येत आहे. सध्या म्हणावा तसा पाऊस नसला तरी शेतकरी मात्र आपली कामे आटोपून घेण्यावर भर देत आहेत.