स्वच्छ भारत अभियानांतर्गत बेळगाव महानगर पालिकेने स्वच्छता मोहीम राबविली आहे. त्यानुसार घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेळोवेळी उचलला जात आहे. मात्र त्यासाठी लागणारे डस्टबिन नागरिक स्वतः खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी मनपाने स्वतंत्र डस्टबिन देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बेळगाव महानगरपालिकेकडून स्वच्छतेचे उपक्रम युद्धपातळीवर राबवले जात आहेत. त्यानुसार घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी कचरा उठावाचे काम केले जात आहे. मात्र डस्टबिन नसल्याने आणि ज्यांना डस्टबिन घेता येत नसलेल्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्लास्टिक पिशवीत अथवा इतर माध्यमातून ओला व सुका वेगळा कचरा देण्यात येत आहे. मात्र यासाठी महानगरपालिकेने स्वतंत्र डस्टबिन दिल्यास सोयीचे होईल.
घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील एक ते 58 प्रभागाचा कचरा उठावाचे काम करण्यात येत आहे. कचऱ्याचे विलगीकरण करणे सोपे व्हावे यासाठी महानगरपालिकेने स्वतंत्र डस्टबिन देऊन नागरिकांची सोय करावी अशी मागणी होत आहे.
डस्टबिन दिल्यास सुका व ओला कचरा वेगवेगळा करून देणे नागरिकांनाही बंधनकारक असणार आहे. डस्टबिन दिल्यानंतर नागरिकांनाही ओला व सुका कचरा ठेवणे सोपे जाणार आहे. हे मिळकत धारकांकडून जो कर घेण्यात येतो त्याच माध्यमातून डस्टबिन देऊन त्यांचे सोय करावी अशी मागणी होत आहे. कराच्या स्वरूपात आकारणारी रक्कम जर चांगल्या कामासाठी उपयोगात आणली गेली तर यापुढे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.