तालुका पंचायत सभागृहात एका महिलेला दम दिल्याप्रकरणी तालुका पंचायत अध्यक्ष यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडणार आहे. कर्नाटक दलित युवा संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
नुकतीच झालेल्या तालुका पंचायत बैठकीत लग्नपत्रिका वाटली नाही म्हणून एका अधिकारी महिलेला तुझी बदली करतो असा दम दिला होता. मात्र हे प्रकरण अध्यक्ष शंकरराव पाटील यांना चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. दलित संघटनेच्या वतीने जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शंकरगौडा पाटील यांची खुर्ची खाली करण्यासंदर्भात आवाज उठविण्यात आला.
वैयक्तिक लग्नपत्रिका वाटली नाही म्हणून तालुका पंचायत सदस्य नदाफ यांनी आम्हाला तालुका पंचायतमध्ये अपमानास्पद वागणूक मिळते असे म्हटले होते. मात्र अध्यक्षांनी मागचा पुढचा विचार न करता संबंधित अधिकारी महिलेला बदली करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे दलित युवा संघर्ष समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे.
तालुका पंचायत चे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी एका दलित महिलेला अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी केवी राजेंद्र यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या वेळी दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.