महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्याची वाताहत झाली आहे. विशेष करून हा रस्ता आजरा नेसरी गडहिंग्लज आणि यासह इतर भागाला जोडणारा आणि महत्त्वपूर्ण रस्ता आहे. मात्र जसा महाराष्ट्र व कर्नाटक आणि सीमाप्रश्नाचा वाद आहे तसाच हा रस्ताही वादात पडून आहे.
कोवाड,आजरा, गडहिंग्लज आदी भागातील नागरिक बेळगावात खरेदीसाठी व व्यवसायासाठी येत असतात. शॉर्टकट रस्ता म्हणून कुदनुर ते हांदिगनूर हा चार ते पाच किलोमीटरचा संपर्क रस्ता आहे. मात्र ना कर्नाटकाने ना महाराष्ट्राने या रस्त्याकडे लक्ष दिले . त्यामुळे या रस्त्याची पूर्णता वाताहत झाली आहे.
काही प्रमाणात हा रस्ता महाराष्ट्र हद्दीत डांबरीकरण करून नागरिकांची सोय करण्यात आली आहे. या रस्त्यावर काही गावे लागतात. मात्र रस्ता खराब असल्याने येथून ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात वाहने घसरून पडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कर्नाटक असो वा महाराष्ट्र हा रस्ता होणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याच पद्धतीने आता या रस्त्यासाठी न्यायालयात जावे लागणार काय? ही भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. कर्नाटकात केवळ अर्धा ते एक किलो मीटर पर्यंतच रस्ता येतो मात्र हा रस्ता करण्यात आला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र मध्येही काही प्रमाणात रस्त्याची वाताहत झाली आहे. त्यामुळे रस्ता केल्यास नागरिकांना सोयीचे होईल अशी मागणी होते.