राष्ट्रीय महामार्ग असो वा ग्रामीण भागातील रस्ता असो सर्वच ठिकाणी आता तळीरामांचे मद्य ढोसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे या कारवायांवर रोख आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
येळ्ळूर रस्ता, यरमाळ रस्ता ,किणये, वेंगुर्ला रोड, गोवा रोड, सावंतवाडी असो वा बेगळूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग असो सर्वच ठिकाणी मद्यपिनी निसर्ग धोक्यात आणल्याचे दिसून येत आहे. निवांतपणे बसण्यासाठी निसर्ग संपत्ती धोक्यात घालण्याचे काम हे तळीराम करीत आहे. त्यामुळे अशा तळीरामावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोणतेही मैदान किंवा खुल्या जागा या तळीरामनी सोडल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे दारू ढोसून बाटल्याही फोडून धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी तर हा धिंगाणा कारच्या डॉल्बी सिस्टिमवर लावून रात्रभर असे प्रकार करत असतात. याकडे दुर्लक्ष करून पोलीस प्रशासन आपली जबाबदारी संपली असेच म्हणत आहेत.
काही तळीराम तर शेतकऱ्यांच्या जीवावरच उठले आहेत. शेतात दारू ढोसून बाटल्या शेतात फेकून पसार होत आहेत. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. शेतातील काम कमी आणि बाटल्या काढण्याचे काम अधिक शेतकऱ्यांना लागत आहे. त्यामुळे या तळीरामचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
आता शेतातील कामे सुरू होत असून आता शेतकऱ्यांच्या पायात या दारूच्या फुटक्या बाटल्यांचा काचा घुसत असून शेतकऱ्यांना काळजी घेऊन आपल्या शेतात फिरण्याची वेळ या तळीरामांनी आणून ठेवली आहे.