आंतरराष्ट्रीय चित्रकार विकास विनायक पाटणेकर याना उरुग्वे येथील अत्यंत मानाचा म्हणून ओळखला जाणारा इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार जागतिक पातळीवरचा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. द मोस्ट आऊट स्टँडिंग मेन ऑफ द इयर अंतर्गत जगभरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
या पुरस्कारासाठी चारशे परीक्षक विविध कसोट्यावर संबंधित क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तीची निवड करतात.२०१८- १९ या वर्षातील कामगिरीची दखल घेऊन विकास पाटणेकर यांची निवड करण्यात आली आहे.
विकास विनायक पाटणेकर हे मूळचे बेळगावचे असून सध्या त्यांचे वास्तव्य मुंबईत आहे.
त्यांच्या चित्रकलेच्या कौशल्याचे यापूर्वीही अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे.चित्रमहर्षी कै. के.बी.कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले.जलरंग हे माध्यम चित्रकलेत अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक मानला जातो.या जलरंग माध्यमावर विकास पाटणेकर यांचे प्रभुत्व आहे.
रॅडिसन हॉटेल आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, उरुग्वे या दोन ठिकाणी विकास पाटणेकर यांच्या चित्रांची स्वतंत्र (सोलो) प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत.
दि.२ सप्टेंबर २०१९ रोजी उरुग्वे येथे निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.आपल्याला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा देशासाठी अभिमानास्पद आहे ,अशी प्रतिक्रिया विकास पाटणेकर यांनी व्यक्त केली.
पुरस्कार जाहीर झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना बोलावून अभिनंदन केले .यावेळी विकास यांनी जलरंगातील एक चित्र मुख्यमंत्र्यांना भेट दिले.