बेळगाव शहरातून जाणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा कॉलेज रोड सध्या ट्रॅफिक जामने त्रस्त झाला आहे. वारंवार या मार्गावर ट्राफिक जाम होत असून ते निवारणाच्या बाबतीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आज पुन्हा एकदा कॉलेज रोडवर भलेमोठे ट्राफिक जाम झाले. रस्त्याच्या एका बाजूने वाहने कोंडली होती. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास नागरिकांना वाट बघावी लागली आहे.
दुपारच्या वेळेला झालेल्या ट्राफिक जाम ने अनेकांची गैरसोय केली आहे. ट्राफिक जाम होण्याची कारणे शोधून काढणे महत्त्वाचे आहे. कित्तुर चन्नम्मा चौकात वाहने कोंडून संपूर्ण कॉलेज रोडवर एका बाजूने अडकून पडत असून बेळगावात आहोत की मुंबईत आहोत? असे विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे .
कित्तूर चन्नम्मा सर्कल, मीलन हॉटेल, खैबर हॉटेल ,आर एल एस कॉलेज पर्यंत ट्रॅफिक अडकून पडल्यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवसा बेळगाव शहरात अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय फक्त कागदावरच राहिला आहे. अवजड वाहतूक जोरात सुरू आहे .त्यामुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे.
आधीच काँग्रेस रोड एका बाजूने बंद असल्यामुळे रहदारी खोळंबत असताना आता कॉलेज रोडवर ही रहदारी अडकून पडत असल्यामुळे समस्या निर्माण होत असून यावर पर्यायी उपाययोजना करण्याची गरज आहे.