पुणे बंगळूर महामार्गावर अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्या त्या औरंगाबाद येथील सात तरुणांचे मृतदेह आज सायंकाळी रवाना करण्यात आले आहेत.काल रविवारी सायंकाळीच हे सर्व मृतदेह के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटल च्या शवागारात ते मृतदेह होते. आज सर्व मृतदेहांवर पोस्ट मार्टेम करून दोन गाड्यांतून सात मृतदेह औरंगाबाद ला रवाना करण्यात आले आहेत.
उद्या त्या सर्व युवकांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. औरंगाबाद येथून हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी या सर्व तरुणांचे नातेवाईक बेळगावला आले होते. त्यांना आपले दुःख आवरता आले नाही. अनोळखी शहरात काय करावे या प्रश्नांत अडकलेल्या त्या मंडळींना बेळगाव मधील 20 ते 25 तरुणांनी मदत केली आहे.
रविवारी ट्रक आणि कार मध्ये धडक होऊन पुणे बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले होते. रविवारी दुपारी दीड च्या सुमारास ही घटना घडली होती.
श्रीनगर गार्डन जवळ निसर्ग ढाब्याच्या जवळील भागात महामार्गावर हा अपघात घडला होता. कारमध्ये असलेले आणि गोव्याला पर्यटनासाठी निघालेले सातही तरुण ठार झाले. रहदारी उत्तर विभाग पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला होता. तर आज सोमवारी उशीरा पोस्टमार्टम करण्यात आले आहे.
या घटनेतील मृतांवर लवकर अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांनी के एल ई चे चेअरमन प्रभाकर कोरे यांना फोन केले होते. बेळगावातील समिती नेते प्रकाश मरगाळे, विश्वनाथ पाटील, गणेश दड्डीकर, परशुराम कोकितकर, अमोल केसरकर, राजू मरवे, पुंडलिक चव्हाण, अंकुश केसरकर, रत्नप्रसाद पवार, किरण बडवाणाचे, नितीन कुलकर्णी, महेश जुवेकर व प्रमोद होनगेकर यांनी दिवस भर के एल इ मध्ये राहून मदत केली आहे.