महाराष्ट्र हद्दीत येणाऱ्या आणि काही भाग कर्नाटकात येणाऱ्या अतिवाड धरणातील बेकायदा माती उपसा करण्यात येत आहे. या उपशामुळे धरणात भले मोठे खड्डे पडले आहेत. मात्र या प्रकरणाकडे संबंधित ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे.
धरणात जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून ही माती काढण्यात येत आहे. या मातीचा वापर शेतीसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कोणालाही न सांगता मनमानीपणे हा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. परवानगी न घेता हा कारभार बेकायदेशीर असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
धरणातील माती ही सुपीक असल्यामुळे ही माती उपसून शेतीस वापरण्यात येत असून धरणात मात्र मोठे खड्डे पडत आहेत. यामुळे कोणीही पोहायला गेल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. यामुळे हा गैर कारभार थांबवावा अशी मागणी होत आहे.
कर्नाटक हद्दीतून अधिक प्रमाणात मातीचा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे हंदिगनूर ग्राम पंचायतीने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. तसेच तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीनेही या बेकायदेशीर उपश्याकडे लक्ष द्यावे ही गरज आहे.