Friday, December 27, 2024

/

बेळगाव आणि शिवसेना 53 वर्षाचे अतूट नाते….

 belgaum

शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन साजरा होतोय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही संघटना आज मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. आज शिवसेनेच्या बळावर केंद्र सरकार उभे आहे. बेळगाव आणि सीमाप्रश्नाशी शिवसेनेचे एक अतूट असे नाते आहे, या नात्याने सीमावासीयांच्या पाठीशी एक खंबीर असे पाठबळ निर्माण केले. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्वतः बाळासाहेब आणि शिवसेनेच्या योगदानाचा उल्लेख आणि जागर करावा लागेल.

शिवसेना सुरुवातीपासूनच सीमावासीयांच्या पाठीशी आहे. स्थापनेपासून 1966 लाच शिवसेनेने पहिला लढा घेतला तोच सीमाप्रश्नाचा. 1968 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 1 नोव्हेंबर काळ्या दिनी बेळगावला आले होते. बेळगावला येऊन त्यांनी केंद्राला इशारा दिला होता. पुढचा काळा दिन करावा लागणार नाही अशा शब्दात त्यांनी सीमावासीयांना धीर दिला होता. सीमाप्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत फिरकू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांनी प्रखर आंदोलन छेडले, उपपंतप्रधान मोरारजी देसाई हे मुंबईत येणार होते. शिवसेनेने त्यांचे वाहन अडविण्याचा निर्णय घेतला होता पण अडवणूक करणाऱ्यांना चिरडून पुढे जाणाऱ्या मोरारजींनी 1969 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे आव्हानच चिरडण्याचा प्रयत्न केला आणि एक प्रखर आंदोलन करण्यास भाग पाडले, या आंदोलनात शिवसेनेचे 67 हुतात्मे झाले.

Shivsena Vardhapan Din 2019

यानंतर अक्षरशः मुंबई पेटली होती. बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यात आली. जेल मधून शांत राहा असे आवाहन त्यांना करावे लागले. त्यानंतर मुंबई काही प्रमाणात शांत झाली.त्यानंतरही सातत्याने शिवसेना पाठीशी राहिली. 1986 साली छगन भुजबळ यांनी कन्नड सक्ती विरोधी आंदोलन पेटवले. शिवसेना नेते वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी आदी शिवसेना नेत्यांनी सीमाप्रश्नासंबंधी कायम ठोस भूमिका घेतली.

शिवसेनेचे आमदार निवडून येऊन विधानसभेत आवाज उठवू लागले. 1996 मध्ये शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर आल्यावर प्रचंड प्रयत्न करण्यात आले. मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही. खासदार अरविंद सावन्त यांनी तर येळ्ळूर येथील अमानुष मारहाणी संदर्भात संसदेत आवाज उठवला होता.

आता शिवसेना केंद्रात प्रबळ आहे. या शक्तीचा योग्य उपयोग करून शिवसेनेने आणि शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरून त्याचा सोक्षमोक्ष लावून घेण्याची आज खरी गरज आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली आणि त्यांच्या शिवसेनेची ध्येयपूर्ती ठरेल.
शिवसेनेच्या आजवरच्या योगदानाबद्दल सतत ऋणी राहतील सीमावासीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.