पावसाळा सुरू होत आहे. शहरातील धोकादायक झाडांची परिस्थिती अवघड बनली आहे. यासंदर्भात वनखाते, बेळगाव शहर महानगरपालिका आणि हेस्कोम यांनी एक संयुक्त मोहीम राबवून धोकादायक झाडांची यादी बनवली आहे .
शहरातील 500 झाडांच्या अनावश्यक फांद्यांची छाटणी केली जाणार आहे तसेच 25 अतिधोकादायक झाडे कायमस्वरूपी तोडली जाणार आहेत. त्या झाडांच्या फांद्या किंवा ही झाडे पडून पावसाळ्यात नको ते नुकसान टाळण्यासाठी ही उपाययोजना राबवण्यात येणार आहे.संबंधित खात्यांच्या तीन टीमने सर्वेक्षण केले असून आता छाटणी व तोडणीचे काम करण्यात येणार आहे . त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित करून हे काम करण्यात येणार आहे.
(File photo: dangerous trees belgaum city )
29 एप्रिल रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी आर विशाल यांनी बैठक घेऊन बेळगाव शहरातील धोकादायक झाडांची संख्या मोजा अशी सूचना केली होती. याचबरोबरीने एकूण झाडांचा सर्वे करण्याचे आवाहन त्यांनी केले होते .जुन्या मुळे निकामी झालेल्या झाडांचा बंदोबस्त करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी केली होती.
वन विभागाने एकूण 523 धोकादायक झाडांपैकी 95% झाडांची छाटणी केल्यास धोका टाळता येतो आणि पाच टक्के झाडे पूर्णपणे काढावी लागणार आहेत अशी माहिती त्यांना दिली होती .याप्रकारे झाडे शोधून काढून अतिधोकादायक धोकादायक आणि कमी धोकादायक या प्रकारात वर्गीकरण करण्यात आले. आणि त्यानंतर आता छाटणी व तोडणीचा निर्णय घेण्यात आला आहे .मागील वर्षी आणि त्यापूर्वी झाडे उन्मळून पडून तसेच झाडांच्या फांद्या पडून घरे व सार्वजनिक मालमत्ता यांचे नुकसान झाले आहे .वाहनांवर झाडे पडून अधिक प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहणीत आले आहे .त्यासंदर्भात आत्ताच खबरदारी घेतली जात असल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेचा काहीतरी उपयोग झाला असेच म्हणावे लागेल.