तालुक्यातील तालीम व कुस्ती आखाड्यांना अनेक गैरसोयीचे ग्रहण लागले आहे. अनेक ठिकाणी व्यायाम करणाऱ्या पैलवानांना त्याची सवय झाली आहे. शरीर दणकट करावे संरक्षणासाठी सज्ज व्हावे नामांकित मल्ल होऊन गावांचे नाव लौकिक करावे यासाठी धडपडणारे पैलवान या गैरसोयीमुळे नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
कुस्ती आखाड्यात आता पाठबळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालीम केवळ कुस्तीचे केंद्र नाहीत तर संस्काराचे विद्यापीठ आणि संरक्षणाचे सुरक्षा कवच आहे. तालमीचा वस्ताद म्हणजे त्या परिसरातील पुढारी पोर वाया जाऊ नयेत आणि पोरी बाईंकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये याची काळजी घेणारा प्रमुख असतो.
पूर्वीच्या काळी चुकून जरी वाद उद्भवला तरी परिसरातील वाद तालमीतच मिटवले जात होते. बाहेरच्या कोणालाही हस्तक्षेप करू दिला जात नव्हता. मात्र आज तालमींची अवस्था पाहिल्यास त्या असून अडचण नसून खोळंबा अशी झाले आहेत. तालुक्यातील अनेक तालमी बंद अवस्थेत आहेत. काहीतर पिळदार शरीर बनविण्याकडे सध्याची पिढी वळल्याने अशी अवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्वी वस्ताद यांच्या शब्दाचा बाहेर कोणी जाणार नाही अशी परिस्थिती होती. शरीर मन खंबीर होण्यासाठी तालीम मोठे काम करते. पूर्वी तालमीचे वस्ताद सर्व लोकांवर लक्ष ठेवत होता. प्रत्येकाचा चेहरा वाचून त्या चेहऱ्यावर अडचण होत होती आता एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहण्याची कोणाची तयारी नसते. किंवा तेवढा वेळही नाही. आपलं झालं थोडं त्यात पाहुण्यांना धाडलं घोडा अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे. त्यामुळे तालीम वाचवण्यासाठी आता संस्थाबरोबरच दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांनी ही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक आखाड्यात माती राहिली नाही किंवा त्या ठिकाणी सराव करणारे पैलवान राहिले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेली दुरावस्था आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील कुस्ती आखाडा गैरसोयीचे ग्रहणच लागले आहे. असे म्हणावे लागेल प्रत्यक्षात तसे पाहिला असता तालमीजवळ पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. मात्र पाण्याअभावी आणि इतर काही सोयीमुळे तालमीचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज बनली आहे.