नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.भावी करिअरच्या दृष्टीने इयत्ता दहावी व बारावी ही अत्यंत महत्त्वाची शैक्षणिक वर्षे समजली जातात. पारंपारिक अर्थाने उत्तम मार्क्स म्हणजे भविष्यातील उत्तम करिअर असे समजले जाते. मात्र आज 2019 मध्ये केवळ उत्तम मार्क्स असून भागत नाही अथवा कमी मार्क्स म्हणजे करिअरच्या वाटा खुंटणे असेही नाही.
एका बाजूला माहितीचा अभाव तर दुसर्या बाजूला आगंतुक सल्ले या दोहोंमध्ये विद्यार्थी व पालक दोघेही गोंधळलेले दिसतात. अशावेळी योग्य मार्गदर्शन व तज्ञांचे समुपदेशन आवश्यक ठरते. बेंगलोर, पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये असे समुपदेशन व मार्गदर्शन सहजासहजी उपलब्ध होते.
बेळगाव सारख्या छोट्या शहरांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना आपले मित्र, नातेवाईक व शेजारी यांच्या सल्ल्यावरच अवलंबून राहावे लागते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन याच विषयावरील मार्गदर्शन करण्याकरिता मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने येत्या रविवार, दिनांक 5 मे रोजी सकाळी 10.30 वाजता ‘करिअरच्या नव्या दिशा-नवे मार्ग’ या विषयावर द युनिक अकॅडमी,पुणे यांच्या बेळगाव शाखेचे प्रमुख श्री. राजकुमार पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडीच्या सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतीला, आजच्या स्पर्धात्मक युगात पुस्तकी ज्ञानाच्या बरोबरीने इतर नेमके कोणते व्यावहारिक कौशल्य आवश्यक ठरते, व ते कसे आत्मसात करता येऊ शकते या विषयावरही तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
सदर मार्गदर्शन सत्र हे ‘मोफत’ असून इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी व त्यांचे पालक या दोहोंसाठी खुले आहे.
तरी याचा अधिकाधिक पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री गोपाळराव बिर्जे व कार्याध्यक्ष अनंत लाड यांनी केली आहे.