बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अतिक्रमण करण्यासाठी अनेक नागरिकात स्पर्धा लागल्याचे दिसते. याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे त्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना याचा लाभ होत असला तरी प्रशासनाला मात्र याचे नुकसान सोसावे लागत आहे.
अतिक्रमण करण्यासाठी कोणताही परवाना किंवा कागदपत्रे तसेच संबंधित ग्रामपंचायतीला याची खबर न देता आपला मनमानी कारभार सुरू आहे. अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली अतिक्रमणाची शर्यत करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गायरान जमीन नसल्याचेच चित्र समोर आले आहे.
काही ग्रामपंचायतींना गायरान जमीन म्हणून सुपीक पट्टा होता मात्र त्यावरही आता संक्रांत आली असून त्याठिकाणी काही अतिक्रमण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तालुक्यात सुमारे वीस हजाराहून अधिक गायरान जमिनी आहेत. मात्र वनविभागामार्फत आणि इतर संबंधित खात्यामार्फत याकडे दुर्लक्ष झाल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचेच दिसून येत आहे.
वनविभागातर्फे काही ठिकाणी झाडे लावण्यात आली होती. मात्र ती झाडे तोडून नागरिकांनी त्यावर आपला हक्क दाखवून मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी कोण पुढे येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अतिक्रमण जागेत शेती जनावरांचा गोठा यासह काहींनी आपले घरही बांधले आहेत. तर कुंपण घालून ही जमीन आपलीच आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या अतिक्रमण जागेबाबत कोण दखल घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.