बेळगावचा सुपुत्र आणि बेगुसरायचा जिल्हाधिकारी निखील निपाणीकरचा केला शिवसैनिकांसह अन्य कार्यकर्त्यांनी सन्मान….!
कॅम्प-बेळगाव येथील निखिल निपाणीकर हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनला आहे. बेळगावच्या या सुपुत्राचा बेळगावमधील शिवसैनिक आणि अन्य संघ-संस्थांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
शिवसेनेचे बेळगाव शहर प्रमुख रवींद्र जाधव यांनी शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देवून निखील निपाणीकर याचा सत्कार केला. निखील याने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून बेळगांवकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे रवींद्र जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी निखीलला गुलाबपुष्प देऊन भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती निखील याने सत्काराबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावून बेळगांवचे नाव लौकिक करेन, असा विश्वास व्यक्त केला.
निखिलच्या आजीने नातवाच्या प्रगतीचे तसेच प्रशासकीय सेवेत कार्य करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक करून आनंदाश्रू ढाळताना निखील याला सॅल्युट ठोकला.
कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन गोरले, ज्येष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोतीलालसा धोंगडी, सामाजिक कार्यकर्ते पुरोहित, उमेश येळ्ळूरकर,सक्षम जाधव, आदित्य जाधव, भाजपच्या शिल्पा केकरे, जनसेवा मित्रमंडळाचे नागेश बिर्जे, मराठी युवा मोर्चाचे सुनील जाधव, बिट ब्रेकर्स डान्स ग्रुपचे तुकाराम महिंद्रकर, प्रियांका गच्ची, युवराज हुलमनी, सागर कलबुर्गी यासह अन्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.