आज मराठी माध्यमाकडे पालकांचा ओढा कमी होत असताना युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृती जतनाचे काम मागील वर्षी पासून हाती घेण्यात आले आहे. अश्या वेळी स्वतःच्या मुलीला मराठी माध्यमात दाखल घेत युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सर्वा समोर एक आदर्श घालून दिला आहे.
मागील वर्षी युवा समितीने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला होता त्यावेळी धनंजय पाटील यांनी कॅन्टोनमेंटच्या शाळेत जाहीर केले की पुढील शैक्षणिक वर्षात आपल्या मुलीला ते मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करणार अखेर एक वर्षा नंतर त्यांनी दिलेला शब्द पाळला असून आपली मुलगी फाल्गुनी हिला या वर्षी मराठी माध्यमाच्या शाळेत भरती केले आहे. त्यांनी आपल्या कन्येसाठी मराठी विद्या निकेतन या शाळेत अडमिशन घेतले आहे.
युवा समितीच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी जवळपास 80 मराठी शाळांमधून आणि 1500 विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने साहित्य वाटप केले होते.
इतर राजकीय मराठी नेते लोकांना मातृभाषेचे महत्व सांगत असतात लोकं नेहमी प्रतिप्रश्न करतात की तुमची मुले तरी मराठी माध्यमातून शिकवता काय? आता हे उत्तर आहे साऱ्यांसाठी की युवा समिती सुरुवात आपल्यापासूनच करते म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया धनंजय पाटील यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
आम्ही सर्व पालकवर्गाना विनंती करत आहोत की महागड्या इंग्रजी शिक्षणाकडे आकर्षित न होता, सर्वगुण आणि संस्कृती परिपूर्ण अश्या मातृभाषेच्या शाळेत शिक्षण द्यावे. आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी सुद्धा युवा समिती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत असे देखील पाटील यावेळी म्हणाले.
युवा समितीच्या ब्रीद वाक्या प्रमाणे ‘चला आपल्या मातृभाषेचा गौरव वाढवूया, आपल्या पाल्याना मराठी माध्यमात शिकवूया’!