पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन युवकांचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा घटने नंतर संपूर्ण कित्तूर परिसर हादरला आहे. मुस्ताक तिगडोळी (वय 29) व मंजुनाथ पट्टणशेट्टी (वय 20)खून झालेल्या दोन्ही मयत युवकांची नावे आहेत.
दरोड्याच्या उद्देशाने पेट्रोल पंपात घुसलेल्या दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील दोघा कर्मचाऱ्यांचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास कित्तूर (जि. बेळगाव) येथे उघडकीस आली.
कित्तूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार हे दोघे कर्मचारी कित्तुर येथील शिवा पेट्रोल पंपावर कार्यरत होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने घुसलेल्या दोघांनी बहुदा पंपातील कॅश काउंटरमध्ये रकमेची शोधाशोध केली असावी. याला विरोध करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांची व दरोडेखोरांची झटापट झाली असावी. त्यानंतर विळ्याने सपासप वार करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही रक्कम चोरीला गेल्याचेही पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दोघांचा खून किती वाजता व नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध घेत आहोत. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरोड्यावेळी दुहेरी खुनाची घटना घडल्याने कित्तूर परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.