प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी आता सरकारने नवी पद्धत काढली आहे. पोस्टल बॅलेट पद्धत रद्द करून आता इ बॅलेट पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या निर्णयामुळे पारंपरिक पद्धत हद्दपार होण्याची शक्यता आहे.
इ बॅलेट पद्धतीने मतदान करण्यासाठी मतदारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर डिजिटल मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे. ती मतपत्रिका डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्याची संधी या पद्धतीमुळे राबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ही मतपत्रिका बंद पाकिटात स्पीड पोस्ट द्वारे पाठवायचे आहेत. ही मतपत्रिका टपालाने कुठे पाठवायची याबाबतची माहिती मतपत्रिका पाठविण्यात येत असलेल्या ईमेल मध्ये नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील टप्प्यात टपाल मतदान ऐवजी आता इ बॅलेट पद्धतीचा वापर अधिक प्रमाणात केला जाईल अशी माहिती मिळाली आहे.
डिजिटल इंडिया च्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे जसे वाढू लागले आहे तसे नवीन बदल दिसू लागले आहेत. इंटरनेट क्षेत्रात झालेला बदल निवडणूक आयोगाने आणि टपाल खात्याने स्वीकारला आहे. काळाप्रमाणे बदल आत्मसात करत आता टपाल मतदानाचा पर्याय म्हणून ई बॅलेटचा वापर केला जाणार आहे. लष्करी जवानांसह नोकरदार वर्गाला आता जर निवडणुकाच्या कामात जपण्यात आले तरी त्यांनाही इ बॅलेट पेपरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
परराज्यात सेवा करणारे सशस्त्र पोलीस दलातील सदस्य, भारताबाहेरील राहणाऱ्या परंतु सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या व्यक्ती, काही शासकीय कर्मचारी निवडणूक कार्यासाठी आपला सेवा बजावणारे मतदार, प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेले मतदार आदींसाठी आता इ बॅलेट पद्धतीचा वापर चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे.
इ बॅलेट पद्धतीने मतदान करण्याचा खर्च निवडणूक आयोगाने उचलला आहे. या मतपत्रिका सुरक्षित तसेच निर्धारित वेळेत पोचण्यासाठी टपाल खात्याची जबाबदारी महत्त्वाची आहे. सध्या निवडणुकीचे वारे घोंगावत असतानाच अनेकांना इ बॅलेट पद्धतीचा वापर सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे टपाल मतदानाची पारंपारिक पद्धत हद्दपार होण्याची शक्यता आहे.