Wednesday, November 20, 2024

/

पेरणी झाली आता राखणीला फिरूया!

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समिती संक्षिप्त रूपात ‘समिती’. गेली ६३ वर्षे धगधगणारे नाव, जगभरात अनेक आंदोलने होतात,. पण प्रदीर्घकाळ जी आंदोलने चालली त्यात अग्रक्रमाने चाललेलं असं हे आंदोलन. बाकी सगळ्या आंदोलनाचा पाया ‘लाभ ‘असा असताना केवळ भाषेसाठी इतका काळ चाललेला हा एकमेव लढा! समिती कोणती नोंदणीकृत संस्था वा पक्ष नसून ते ‘लोकआंदोलन’ आहे. आपल्या भाषेच्या प्रेमातून उभारलेला जनंदोलन.
समिती आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध निरनिराळ्या प्रकारे निषेध नोंदविते. काळा दिन, मूक सायकल फेरी, हुतात्मादिन, महामेळावा ही त्यांची काही स्वरूपे. दिल्ली दरबारात ढीगभर निवेदनं समितीने दिलेली आहेत.
अशाच एका मार्गाचा अवलंब म्हणजे निवडणूक. लाभाच्या पदापेक्षा निषेदाचा सूर म्हणूनच समितीने निवडणुकांकडे पाहिले आहे. कोणी निवडून आला किंवा नाही याचं फारसं सोयरसुतक मराठी जनतेने मानलं नाही. आपल अस्तित्व व वर्चस्व सिद्ध करणं हाच प्रमुख्याने मराठी माणसाचा उद्देश होता.

Mes logo
चालू लोकसभा निवडणुकीत या आंदोलनाचा भाग म्हणून १०१ उमेदवार उभा करण्याचा निश्चय समितीने केला. समिती पक्ष नव्हे त्याच्याकडे निवडणुकांच्या क्लुप्त्यात माहित असणारे ‘संघ’ नाहीत. मराठी भोळीभाबडी जनता, घोषणा देणारी, रस्त्यावर उतरणारी, लाठ्या काठ्या खाणारी जनता.
समितीची अस्था ,तीव्र इच्छाशक्ती असणार्‍या मराठी जनतेच्या जीवावरच मातब्बरी होती, रुबाब होता आणि माजही होता. सीमाभागात असंख्य लोकांच्या पाठीवर लढ्याचे वळ आहेत. अंगावर घातलेल्या खोट्या केसेस आहेत. पण आजही भाबडी जनता मात्र भाषेसाठी लढतच आहे.
लोकसभेच्या १०१ उमेदवारीसाठी अनेकांनी अपशकुन केले. विरोधी मते नोंदवली, राष्ट्रभक्तीची चिंता व्यक्त केली, पण त्यावरही मात करून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. अनेकांचे अर्ज भरताना खूप त्रुटी निर्माण झाल्या नाहीतर हा आकडा खूप मोठा झाला असता. ही नियमित निवडणुका लढणारी लोक नसल्यामुळे त्यांना कागदपत्रे गोळा करायलाच वेळ मिळाला नाही. त्यातच कडक आचारसंहितेमुळे असणारे नियम सांभाळताना कसरत करावी लागली.
आता सन्माननीय आकड्यात अर्ज भरले गेलेत. शिलेदारांनी काम बजावले, आता काम आहे कपडे सांभाळणार्‍यांचं. लढाई सुरु झालीय. आता हेवेदावे विसरून रस्त्यावर उतरायला पाहिजे, गल्लीबोळात जागर घातला पाहिजे, समितीचा पोत नाचवला पाहिजे, उरात मनात, ध्यानात मराठी घेऊन निष्ठेने राबले पाहिजे. समितीचा आणि मराठी माणसाचा दरारा राखला पाहिजे. दिल्लीपर्यंत एल्गार पोहोचला पाहिजे. ६३ वर्षे राष्ट्रहिता बरोबरच मराठी जनतेने मराठा हित ही जपलं आहे.
मराठी माणसांनी आता एक झालं पाहिजे. हेवेदावे विसरून गल्लीबोळात अंगार चेतवला पाहिजे. ज्यांनी बांधावर बसुन केवळ पेरणी बघितली, त्यांनी आता जागा सोडून आलेल्या पिकांची राखण केली पाहिजे. आपल्या मागल्या पिढीचा रुबाब, आब, दरारा परत मिळवायचा असेल तर मनगटाला मनगट जोडून वज्रमूठ केली पाहिजे.
लढू तर जिंकू, आपला स्वाभिमान परत मिळवू. नाहीतर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.
-गुणवंत पाटील.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.