लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आजपर्यंत अर्ज भरणे, माघार, पडताळणी अशी निवडणूक आयोगाची कामे झाली, पण निवडणुकीचे वातावरण अजून म्हणावे तितके तयार झालेले नाही. उमेदवार कोमात आणि मतदार संभ्रमात असे चित्र बेळगाव लोकसभा मतदारसंघात आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रबळ प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवारच काही कामाचे नसल्याने मतदान करायचे तर कुणाला असा प्रश्न मतदारवर्गासमोर आहे.
भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी हे आपला प्रचार करत असले तरी सुरुवातीपासूनच त्यांना विरोध होत आहे. त्यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी भाजप मधील नेत्यांनी केली होती यामुळे अंगडी यांच्याबरोबर काही नेते फिरत असले तरी ते त्यांचा प्रामाणिक प्रचार करीत नाहीत, याचा फटका यावेळी अंगडी यांना जिकडे जातात तिकडे बसत आहे.
काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेले व्ही एस साधूंनावर यांना तर 90 टक्के जनता ओळखत सुद्धा नाही. यामुळे अजून त्यांचा प्रचार यथा तथाच सुरू आहे. आपण कोण, आपले काम काय आणि आपणाला मतदान का करावे इथे पासून त्यांची तयारी सुरू आहे. यामुळे यावेळी पहिल्यांदाच बेळगाव लोकसभा निवडणुकीत बेळगावमध्ये काँग्रेस पक्ष अनोळखी पक्ष बनला आहे. भाजप ला मदत करण्याचा उद्देश ठेऊन असा अनोळखी उमेदवार देण्यात आला आहे की काय? असेच संशयाचे चित्र निर्माण झाले असून राजकीय क्षेत्रातील जाणकार तसे बोलत आहेत.
अंगडी यांना मोदींच्या नावावर मतदान करा असा प्रचार सुरू असला तरी स्थानिक समस्या घेऊन नागरिक उद्या मोदींजींना भेटू शकत नाहीत. प्रभावी आणि जनतेच्या प्रश्नांना चालना देणारा उमेदवार द्यावा ही मागणी यासाठीच वाढली होती. मोदी लाट असल्याने बेळगावचा उमेदवार निवडून येईल ही कल्पना चुकीची असून जनतेचा पाठींबा नसल्याने मोदींचे प्रभावी काम अंगडींच्या निष्क्रियतेमुळे पुसून गेले आहे, हे स्थानिक भाजप नेते सुद्धा मान्य करत आहेत. यामुळेच अंगडी यांना प्रचंड फटका बसणार असल्याचे भाजप चे नेतेच सांगत आहेत.
स्वतः अंगडी हे सुद्धा या परिस्थितीत बावचळले असून मतदारांसमोर आपण काय केले हे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते सुद्धा फक्त मोदींचे नाव पुढे करून वेळ मारून नेत आहेत.
भाजप च्या या चुकीच्या निर्णयाचा फायदा घेऊन आपला एक प्रभावी उमेदवार पुढे आणला असता तर काँग्रेस चा विजय नक्की होता पण त्यांनाही हे जमलेले नसून आजपर्यंत कधीच चर्चेत नसलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊन काँग्रेसने आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे. उमेदवार दिल्यावर किमान काँग्रेस नेत्यांनी तरी प्रचारात आघाडी घ्यायला पाहिजे होती पण त्यात सुद्धा ते अपयशी ठरत आहेत.
काँग्रेसच्या प्रचारात वनमंत्री सतीश जारकीहोळी यांना सोडता दुसरा कुठलाच प्रभावशाली नेता नाही. बेळगाव दक्षिण मतदारसंघात तर अतिशय प्रभावहीन माणूस काँग्रेस प्रचार करत असून पराभवराज चीच तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.
भाजप मधूनही प्रचारासाठी प्रभावी नेते माघार घेऊन फिरत आहेत. बरेचसे स्थानिक नेते चिकोडीत प्रचार करत आहेत. त्यामुळे उमेदवार अंगडी यांना काही पेड कार्यकर्त्यांवर भरोसा ठेवण्याशिवाय पर्याय नाही. समिती सोडून भाजपवासी झालेल्या एक नेत्याला ते वापरून घेत आहेत पण त्याचाही करिष्मा ओसरला आहे. त्याच्या संपर्कात असलेले अनेक मराठी मतदार अर्धे समिती आणि अर्धे काँग्रेसचे असल्याने भाजपच्या अंगडींनी मत कोण घालणार? हा संभ्रमच आहे.
निवडून आले तरी अंगडी अल्पमतात येणार किंव्हा या दोन्ही पक्षांचा पाडाव होऊन तिसराच कोणीतरी बाजी मारणार असे वातावरण सक्षम उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस व भाजपच्या वाट्याला येणार आहे