आज जालियनवाला बाग हत्याकांडाला 100वर्षे पूर्ण झाली पण तो इतिहास आजही प्रेरणादायी असल्याचं मत प्रा आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
जालियनवाला हत्याकांडातील हुतात्म्यांच स्मरण करून त्यांना स्वातंत्र्यवीर संघटना, जायंट्स मेन, जायंट्स सखी,कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ, मराठी पत्रकार संघ आणि इतर संघटनांच्या वतीने हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारक ईथे श्रद्धांजली वाहण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
१३ एप्रिल१९१९ , पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ होता.पंजाब मधील दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु असे दोन वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता त्यांच्या सुटकेसाठी हिंदू आणि शीख बांधवांचा प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,५००हून अधिक फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ५००हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,२०० हून अधिक आहे.
इंग्रजांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला.
तत्पूर्वी कावेरी कोल्ड्रिंक्सचे संचालक शिवाजीराव हंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी स्वातंत्र्यवीर राजेंद्र कलघटगी, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी, सुनिल भोसले इक्बाल जकाती,नागेश सातेरी,मोहन कारेकर, मदन बामणे, नम्रता महागावकर, ज्योती अनगोळकर, राजश्री हसबे तसेच अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.