सध्या बेळगाव महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला असून कोणत्याच अधिकाऱ्याचा पायपोस कुणाकडे नाही राहिला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
होय….वडगांवची ग्रामदेवता मंगाई मंदिराच्या आवारात सांडपाणी शिरल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटार बंद झाल्याने सांडपाणी रस्त्यावर आणि मंगाई मंदिर परिसरात घुसले आहे.मंगळवारी व शुक्रवारी मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असते त्यातच गेल्या दोन दिवसापासून हे सांडपाणी बाहेर आल्याने रहिवाश्यांना व भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मंदिर परिसर पवित्र ठेवणे गरजेचे आहे यासाठी सांडपाणी समस्या सोडवा अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली, मात्र उडवा उडवीची उत्तर मिळत आहेत मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील अरुण धामणेकर यांनी केला आहे.
मनपा निवडणूक होईपर्यंत आता प्रशासकीय कारभार राहणार आहे. मनपा आयुक्त आहेत पण मनपाच्या कारभारात लोकप्रतिनिधींचे काहीही चालेना अशी अवस्था आहे. यापरिस्थितीत शहराच्या वेगवेगळ्या भागात अनेक समस्या पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यावर मनपा सभागृह अस्तित्वात येईपर्यंत असेच चित्र राहणार काय असे नागरिकांना वाटत आहे.