Saturday, November 16, 2024

/

माहेरवाशीण पार्वतीच्या गौर उत्सवास सुरुवात

 belgaum

चैत्र पाड्व्या नंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरु होतो तो चैत्र गौर उत्सव. चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव . बेळगाव शहरात प्रामुख्याने गुजराती, मारवाडी आणि इतर हिंदू बांधवात विशेषतः महिलावर्ग या उत्सवात गुंतला आहे.चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो.पार्वती माहेर वासासाठी घरी आल्याचे मानले जाते. शंकर पार्वती यांच्या संदर्भात या विषयी एक दंतकथा प्रचलित असुन शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेऊन घेतल्याचे मानले जाते.

खरेतर पार्वती या माहेरवाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो. जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासासाठी माहेरी येत असत .देवघरातील मातीची, पितळी, लाकडी, सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती चैत्रगौर कोणत्या तरी कोनाड्यात, देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करून चैत्र शुद्ध तृतीयेस देवघरात चैत्र गौरीची स्थापना करतात. काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसविण्याची प्रथा असते.

काही भागात अन्नपुर्णेची पुजा केली जाते. गौरीच्या पुढे आरास करण्याचीही प्रथा दिसते. या आराशीतही कलात्मकतेचे प्रदर्शन असते . कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली तर कुठे गौरीसाठी खास मखर केलेलं असते .पायऱ्यांवर सुशोभीत चादर आणि तिन्ही बाजूंनी भरजरी साडय़ांचे पडदे. सर्वात वरच्या पायरीवर गौर. तिच्या समोर घरातली खेळणी. गौरीपुढे कलिंगड टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फुले, फराळांच्या विविध पदार्थांची ताटंही ठेवतात . गौरीपुढं एक बाळ ठेवलेलं असते. गौरी पुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात .

या रांगोळ्याना चैत्रा गण असे म्हणतात, या मध्ये झोक्यावरची गौर, कमळ, स्वस्तिक, ज्ञानकमळ, नाग, शंख, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, डमरू, चंद्र, सूर्यगदा, बेलाचे पान, कैरी किंवा आंबा, गोपद्म, कलश, ध्वज, पंखा, अश्या विविध रांगोळ्या काढल्या जातात. बेल, तुळस, दुर्वा, ब्रह्मा, विष्णू, महेश सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणात असाव्यात असा संकेत आहे. या दिवसात चैत्र गौर बसलेल्या घरांमधून मंगळवार, शुक्रवार या दिवसांना हळदीकुंकू सभारंभ आयोजित केले जातात, संध्याकाळी बायका नटूनथटून एकमेकींकडे चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जातात, महिलांना कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हं, बत्तासे, खिरापत देतात. फळे ,हरभ-यांनी ओटी भरतात.

या दिवसा मध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार,या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे, चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. काही लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एकप्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.