शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करण्यात आघाडी घेतलेल्या त्या नगरसेवकाला दणका देऊन हे काम बंद पाडवण्यात आले आहे.
या सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे शाळा सुधारणा समिती, पालक व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करीत शाळेच्या जागेत स्वच्छतागृहासाठी सुरुअसलेले बांधकाम शनिवारी बंद पाडले आहे.
जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल व पालकांनी शाळेच्या आवारात स्वच्छतागृह बांधता येत नाही. तसेच स्वच्छता गृहामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बांधकाम होऊ दिले जाणार नाही असा पवित्रा घेतला, तसेच बांधकाम करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतला होता असा प्रश्न विचारित काम बंद करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला.
याकामात बेकायदेशीरपणे वागलेल्या त्या नगरसेवकाला चांगलेच धारेवर धरले.
त्यामुळे नागरिकांचा विरोध पाहून बांधकाम बंद करण्यात आले असून यापुढे शाळेची व शाळा सुधारणा कमिटीची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये अशी सूचना करण्यात आली. यावेळी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष जगनाथ गोंडाडकर एपीएमशी सदस्य महेश जुवेकर, राजू मरवे, हणमंत बाळेकुंद्री, कीर्तीकुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, यलाप्पा नागोजीचे, शंकर चौगुले, बाळू गोरल आदी उपस्थित होते.
स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनेक जागा आहेत. त्यामुळे शाळेच्या जवळ सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यास सर्वांनी विरोध केला आहे यामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार होता म्हणून हे काम बंद केलं आहे अशी माहिती रमेश गोरल यांनी दिली.