‘काय तुम्ही फक्त निवडणूक जवळ आली की येता’ बाकीच्या वेळी गायब असता हे शब्द बेळगावच्या विद्यमान खासदारांना उद्देशून बोललेले आहेत.शाहू नगर भागात लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अंगडी यांनी सदाशिवनगर भागात सदिच्छा भेटी गाठी सूरु केल्या आहेत त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आलाय.
निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. कुठल्याही पक्षाने अजून अधिकृतरित्या आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत पण विध्यमान खासदार सुरेश अंगडी यांनी आतापासूनच मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी शाहूनगर भागात जाऊन अंगडी यांनी भेटी गाठी घेतल्या असून माझ्याकडे नव्हे तर मोदींकडे बघून मत द्या अशी विनंती केली आहे.
गेल्या तीन वेळा वाजपेयी येडियुरप्पा आणि मोदींच्या लाटेवर स्वार होऊन निवडुन आलेल्या अंगडीना पुन्हा मोदींच्या कुबड्यांची गरज वाटू लागली अशी देखील चर्चा इथे रंगली होती.
अंगडींनी भेट दिल्यावर काही कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करत होते. तुम्ही फक्त निवडणूक आली की भेटायला येता, बाकीच्या वेळी तुम्हाला आमची आठवण येत नाही. तुम्ही काही काम केले नाही, फक्त कार्यक्रम असले तरच तुम्ही आलाय नाहीतर तुम्हाला भेटायला सुद्धा मिळत नाही, आत्ता परत मत पाहिजे म्हणून आलाय काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
अंगडींनी स्मितहास्य करून या कार्यकर्त्यांना शांत केले. तुमचे आरोप मला मान्य आहेत पण देशात पुन्हा भाजपचे सरकार येण्यासाठी मोदींचे हात बळकट करणे गरजेचे आहे, त्यामुळे माझ्याकडे बघून मतदान करू नका, मोदींचे हात बळकट करा असे ते सांगत होते.इतर पक्षातील इच्छूक उमेदवारही अशीच गाठी भेटी घेऊन कामाला लागले आहेत.