बेळगाव पोलीस दलात लवकरच एटीएस दाखल होणार आहे. दहशतवाद विरोधी पथक अशी त्याची कार्यवाही असणार असून बेंगलोर, म्हैसूर, बेळगाव, मंगळूर आणि हुबळी धारवाड पोलीस आयुक्तालयामध्ये एटीएसचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य पोलीस महासंचालक नीलमणी राजू यांनी याची घोषणा केली असून संबंधित पोलिस आयुक्त यांना सूचना दिलेल्या आहेत .लवकरात लवकर स्थापना करून आतंकवादाला विरोध करण्यासाठी सज्ज राहा अशी सूचना त्यांनी केली आहे. तातडीचे आदेश आल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्रे सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यपातळीवर कारवाई सुरू होती मात्र महत्त्वाच्या शहरांचा विचार करून आणि आतंकवाद्यांचा धोका लक्षात घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बेळगाव शहर आतंकवाद्यांचे केंद्र बनत असल्याची माहिती मिळाली होती. सिमी तसेच इतर अनेक दहशतवादी संघटनांच्या प्रतिनिधींना बेळगाव येथे अटक झाली आहे. यामुळे एटीएस केंद्र स्थापन करताना बेळगाव चा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला आहे.
गोवा महाराष्ट्र यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या बेळगाव मध्ये वास्तव्याला राहून आतंकवादी कारवाया करण्यात येत असल्याची माहिती यापूर्वी उघड झाली होती. त्यामुळे आता पोलीस दल एटीएसच्या माध्यमातून अधिक सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खासदार अनंत कुमार हेगडे यांनी देखील ए टी एस बेळगावला सुरू करू असे आश्वासन दिलं होतं.